Tuesday, February 12, 2008

चॉकलेटची चांदी

प्रत्येकाची स्वत:ची (लहानशी का असेना) अनुभवांची पुरचुंडी असते. त्या पुरचुंडीतल्या अनुभवांवर बेतलेल्या भल्या-बुऱ्याच्या अक्षांश-रेखांशावर आपण कसरत करत असतो आणि जगरहाटीपेक्षा फारकत घेतली तरी ते ’माझे विचार’, ’मला असं वाटतं’ असं म्हणत त्या उभ्या-आडव्या रेघांशी आपण एकनिष्ठ रहातो. पण मला स्वत:ला अनेकदा स्वत:च्याच पायात अडकून पडल्या सारखं होतं आणि माझ्याच विचारांशी मीच एक पिटुकलं बंड करून उठते.

असाच एक प्रसंग परवा घडला. 'Nostalgic' असं काही नसतंच, जुन्या साठवणीतल्या वस्तू, कार्ड्स, काडेपेट्या, स्टँप्स कोणत्याच आठवणी जपत नाहीत असा माझा ठाम विश्वास...पण पुण्यातलं जुनं घर आवरता आवरता, लहाणपणीचं एक ’फास्टर फेणे’ हातात पडलं आणि सहज पानं धुंडाळली तर त्यात सापडली कॅडबरी चॉकलेटची एक चांदीची फॉईल. चमक हरवलेली, अगदी सरळ इस्त्री केल्यासारखी...

कधी ठेवली होती मी? किती जुनी असेल? का ठेवावीशी वाटली असेल? खूप ताण देऊनही काही आठवेना...नाहीच आठवलं! खरं होतं की कोणतीही जुनी आठवण त्या चांदीत नव्हती पण 'nostalgic' असं काही नसतं हे मात्र सपशेल खोटं ठरलं. ती मलूल इस्त्री केलेली चॉकलेटची चांदी मला क्षणभर एक जाळी पडलेल्या पिंपळपानासारखी वाटली आणि माझंच मला हसू आलं.

3 comments:

सर्किट said...

खरंय.

वपुंची एक कविता (!) होती - आठवणी जेव्हा येतात तेव्हां त्यांना थोपवून धरू नये. मग त्या दुप्पट जोमाने हल्ला चढवतात. त्यापेक्षा त्यांना त्यांच्या इच्छेनुसार येवून जाऊ द्यावं, तोवर पेशन्स ठेवावा, जपाची माळ ओढावी - या अर्थाची. ती आठवली हे पोस्ट वाचून.

तुमचं नाव मायबोलीमुळे परिचयाचं आहे. ब्लॉगविश्वावरही स्वागत.

संवादिनी said...

chaan chaan.....ahsya chandya pushkal thevalya hotya me......pan sapadavishi vaTalin tari dushTa sapaDatach nahi...

Iravatee said...

सर्किट, थॅंक्स, १०० टक्के सहमत आहे तुझ्याशी.
BTW मायबोलीवरची इरावती मी नाही, केवळ नावात साम्य...ब्लॉगविश्वावरील स्वागतासाठी आभारी आहे.

संवादिनी, आभार आणि तुझ्या ’पिंपळपानांच्या’ शोधासाठी शुभेच्छा...