Sunday, February 24, 2008

झेड(Z) ब्रिज - एक महत्वाचा कट्टा

"रावी, झेड ब्रिज वर येशील सहा वाजता? बोलायचंय" पुण्यात वीकेंडला गेलं की हमखास हे झेड ब्रिजचं एखाद्या मित्र-मैत्रिणीचं आमंत्रण मिळतंच. झेड ब्रिज हा खरंतर कट्टा नाहीच पण काहीतरी महत्वाचं वाटणारं असं बोलण्याची अनेकांची हक्काची जागा.
तुम्ही पुण्याचे नसाल तर झेड ब्रिज काय प्रकार आहे हे सांगण्यासाठी हा खटाटोप. एक अतिशय अजब डिझाईन असलेला Z आकाराचा हा नदीवरचा पूल आहे. असं ऐकलंय की हा पूल पूर्ण झाला त्यानंतर त्याची एकूण लायकी पाहून तो फक्त टू-व्हीलर आणि रिक्षांसाठी राखून ठेवावा लागला. नदीच्या दोन्ही टोकाला एकाच अँगल मधे कनेक्शन मिळाले नसल्याने तो झेड आकाराचा आहे म्हणे. हास्यास्पद आहे हे पण कट्टा बाकी महत्वाचा आहे आमचा. दोन्ही बाजूंनी वाहणाऱ्या लांबच लांब पादचारी मार्गावर आणि डिवायडर्सवर बसून गप्पा टाकण्यासाठी तुम्ही ’युगुल’ असण्याची गरज नाही. दोन मित्र, दोन मैत्रिणी, मित्र आणि मैत्रीण, प्रियकर आणि प्रेयसी आणि अर्थातच मित्र-मैत्रिणींच्या टोळ्या अशी वाट्टेल ती कॉम्बीनेशन्स इथं दिसतात. तर असा हा झेड ब्रिज.
आजही आमच्या पश्या नावाच्या मित्राला झेड ब्रिजवर भेटून आले. त्याचा ’पुन्हा’ प्रेमभंग होऊ पाहतोय हे त्याला माझ्याशी शेअर करायचं होतं. पश्या अनेकदा बेहद्द प्रेमात पडल्याचं ’गुपीत’ सुद्धा ह्याच झेड ब्रिजनं अनेकदा ऐकलंय. बिचारा पश्या आणि खरंतर बिचारा झेड ब्रिज पण.

0 comments: