एवढ्यात माझ्या ऑफिसचे ऍडमिन आणि त्या डिपार्टमेंट्चा लाडका ट्रॅव्हल एजंट ह्यांच्या कृपेने मला USला जाताना Heathrow Airport वर काही तास अडकून पडावे लागले. तटस्थपणे माणसे पहात बसायाची आवड आसलेल्या कोणालाही असे फलाटावर, प्लॅट्फॉर्मवर किंवा एअरपोर्टवर आडकून पडणे ही मेजवानीच असते. वेगवेगळ्या प्रकारची, वयाची, आकाराची, रंगांची तसेच वेगवेगळ्या हावभावाची इतकी ’मनुष्ये’ एकदम पहाणे ही मोठी मौजेची बात असते (किमान माझ्यासाठी). मी अजिबात एकलकोंडी किंवा माणसे टाळणारी नाही, पण अश्या परिस्थितीमधे मी हमखास एकटे असणे पसंत करते. उगीच कोणाशी ओळख करून घे, गप्पा मार, एखाद्या आज्जीबाईना मदत करायाला जा (त्यांनी मागितल्याशिवाय!) असल्या गोष्टी मी टाळते. इतकेच नाही तर (उगीच ’शॉक खाऊ’ नका मंडळी!) माझ्याकडे एक अतिशय डार्क ग्लासेस चा गॉगल पण आहे...जो खरतर नागपूर टाईपच्या टळटळीत उन्हाळ्यात फक्त वापरण्याच्या लायकीचा आहे. पण केवळ अश्या मनुष्यमेळ्यांमधे बिनदिक्कतपणे आणि लोकांच्या सहज-स्वाभाविक हालचालींना धक्का न लावता पाहता यावे यासाठी मी तो प्रवासात ठेवते. ही आयडिया माझ्या ’एका मित्राची’ आहे (त्याचे नाव वापरण्याची ’इजाज़त’ मिळाली नाहिये महाराजा!) त्याच्या कॉलेजच्या दिवसांमधे म्हणे, मुलींशी ’डोळ्यात बघून’ बोलायची हिम्मत होत नसे, म्हणून हा इलाज वापरत होते महाशय! हा context भयंकर वाटला होता त्याने आम्हाला नंतर सांगितला तेव्हा, आणि ग्रुपमधे (विशेषतः मुलींनी) चिकार शिव्या घातल्या होत्या.
पण Honest confession , मी हाच प्रकार एअरपोर्टवर करते. "माणसे-बिणसे काही नाही, निव्वळ ’पोरे’ पहायची असतात तुला" असा आरोप गमतीत होतो माझ्यावर, पण त्यावर वेळप्रसंग पाहून मी पुढील तीनमधले एखादे Counter argument करते.
१. पोरांमधे काय असते बघण्यासारखे? (प्रश्नकर्त्याचा रोख chauvinist असल्यास)
२. अरे त्या पलीकडे जाऊन पहा, अनोळखी माणूसप्राणी हमखास अनपेक्षित कसा वागतो ते, त्यासाठी त्याला conscious न केलेला बरा. (प्रश्नकर्त्याचा रोख sincerely curious वाटल्यास)
३. पोरांकडे पहायला कसली आलीय भिती, असं भ्यायला मी काय 'XYZ' (आमचा डार्क गॉगल आयडियेचा जनक) वाटले का! (प्रश्नकर्त्याचा रोख मला खिंडीत गाठण्याचा वाटल्यास)
असो, तर मूळ मुद्दा असा की असे नाटकाला किंवा सिनेमाला बसल्यासारखे किंवा आर्ट एक्ज़िबिशन बघितल्यासारखे, माणसे पहात बसणे हा एकतर्फी-अथांग अनुभव असतो माझ्यासाठी. त्यात लौकीकार्थाने ’संवाद’ नसतो. असलाच तर तो वेगळ्या पातळीवर असतो. म्हणजे एखादे भिंतीवरचे अफलातून चित्र आपल्याशी खरेखुरे बोलत जरी नसले तरी ते ’संवाद’ साधू शकते ह्या abstract statement वर जर तुम्ही विश्वास टाकू शकलात तरा कदाचित मी काय म्हणू पहातीय हे पटू शकेल. असा मूक-संवाद साधणारी चालती-हालती-बोलती प्रदर्शने नेहमीच मोहात टाकत रहातात ती ह्यासाठीच.
’हिथ्रो’वर ह्यावेळी हमखास आठवत राहिला तो लाहान मुलांचा प्ले एरिया... मी थांबले होते त्या टर्मिनलवर वेटिंग एरियाच्या मध्यभागी लहानसा सॉफ्ट मटेरियलचा एक हौदसदृश प्ले एरिया होता. २ ते ४ वर्षाची, ५ छोटी पोरे दणकून दंगामस्ती करत होती तिथे. मजेत...असं वाटावं की जणू सगळी भावंडं आहेत, किंवा अगदी जवळचे मित्र. एक भारतिय, एक अफ़्रिकन वंशाचं, दोन आखाती देशातली भावंडं आणि एक चिनी. ज्यांना कदाचीत स्वत:च्याच मातृभाषा जेमेतेमे येऊ लागल्या असणार, एकमेकांच्या येण्याचा संभवच नव्हता. पण काहिही अडत नव्हतं. त्या-त्या पोरांचे आई-बाप कडेला पहारा देत उभे होते. अंधूकपणे एकमेकांकडे पाहून जडपणे हसल्यासारखे करत होते. पण बोलण्याचा प्रश्नच नव्हता..कसे बोलणार ना!! भाषा कुठे येत होती, शिवाय रंग, शिक्षणे, पैसा, जात-धर्म... एक का गोष्ट असते तपासायची! मात्र त्या लहानग्यांचं काहीही अडत नव्हतं. त्यांचं जग भाषेशिवाय किंवा कसल्याच प्रोटोकॉल्सशिवाय छान चालत होतं, अपार आनंदाने भरून वहात होता तो हौद.
क्षणभर वाटलं, हे असंच्या असं का नाही होत मोठं जग! मोठं होण्याच्या कोणत्या वळणावर आपण अनावश्यक कटूता वाढवणार्या गोष्टी शिकतो? वेग-वेगळी सामाजिक, वांशीक, आर्थिक, धार्मिक अवडंबरं घेउन वावरणारं मोठ्यांचं बंदिस्त जग होतं चोहीकडं...आणि ठिबक्याएवढं त्या लहानग्यांचं एक मुक्त जग होतं मध्यभागी...भविष्यातल्या मानवी नातेसंबंधांच्या कडु औषधाच्या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ असलेलं. मला क्षणभर वाटलं मोठं होण्याच्या प्रवासातलं ते वायफळ वळण काढून टाकता आलं तर? छे! पण ते शक्य नाही. एक वळण नाहीच खरतर ते, टप्या-टप्या वर सहजपणे न दिसणारे खाच-खळगे आहेत ते...
मला खिन्न वाटलं आणि अन्नुत्तरीत देखील.
Saturday, March 15, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
Welcome to the blog world :)
chhaan tipla aahes. it will be definitely fantastic if we can retain the childhood innocence. Heathrow mhanje agdi rlwy station saarkha airport aahe - khup loka astaat, aani ase barech loka distaat.
mi kadhi goggle vaaparla naahiye, lekin idea buri nahin hai. next time, harkat nahi vaapraaylaa. :D
keep writing.
~ketan
hay iravatee ... welcome to the blog word... :)nehami lihit jaa
इरावती, आवडली पोस्ट, जास्त करुन शेवटचा पॅरा. ब्लॉगत रहा. :)
Post a Comment